प्रभाग क्रमांक १३ निगडी गावठाण परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात सचिन काळभोर यांची आमदार महेश लांडगे यांना विनंती

0 झुंजार झेप न्युज

प्रभाग क्रमांक १३ निगडी गावठाण परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात सचिन काळभोर यांची आमदार महेश लांडगे यांना विनंती

निगडी, पिंपरी चिंचवड,दि.09: भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी आगामी निवडणुकीत ४० नगरसेवक विजयी करण्याचा दावा फेसबुक पोस्टद्वारे केला असला, तरी प्रभाग क्रमांक १३, निगडी गावठाण परिसरातील नागरिकांच्या नागरी समस्या अद्यापही कायम आहेत, अशी खंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी व्यक्त केली आहे.

सचिन काळभोर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “मी वैयक्तिक पातळीवर विरोध करत नाही, मात्र जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कृती करावी, ही विनंती आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये मागील अनेक वर्षांपासून अनेक गंभीर नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. सेक्टर २२ येथील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधलेली घरकुल इमारत १४–१५ वर्षांपूर्वी पूर्ण झाली, तरीही ९२० पात्र लाभार्थ्यांना अद्याप घर मिळालेले नाही. मुंबई उच्च न्यायालयातील स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ही योजना आजही अडकलेली आहे.”

काळभोर यांनी पुढे सांगितले की, पीसीएमसी कॉलनीतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या ५७६ नागरिकांचे स्थलांतर अद्याप झालेले नाही, तसेच त्या इमारतींचे पुनर्बांधकाम करण्याबाबतही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. तसेच आण्णाभाऊ साठे नगर वसाहतीतील २५६ गाळाधारकांना रेड झोन क्षेत्रातील बाधित जागांवर ठेवण्यात आले असून, त्यामुळे तेथे पुन्हा नागरी समस्या निर्माण होत आहेत.

याशिवाय, यमुना नगर, साईनाथ नगर आणि सेक्टर २२ परिसर रेड झोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे नागरिकांचे पुनर्वसन व बांधकाम प्रकल्प ठप्प झाले आहेत. येथे एसआरआर प्रकल्प राबविण्यात येत असून, सामान्य नागरिकांना विश्वासात न घेता बिल्डरांना प्राधान्य दिले जात आहे, असा आरोपही काळभोर यांनी केला. त्यांनी नमूद केले की, काळभोर गोटा परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भाजी मंडईचे गाळे बांधले, मात्र आजपर्यंत ते वाटप करण्यात आलेले नाहीत. तसेच यमुना नगर रुग्णालयाचे बांधकाम रेड झोन क्षेत्रात होत असल्याने त्या कामालाही कोणताही दिलासा मिळालेला नाही.

काळभोर यांनी सांगितले, “२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक या प्रभागातून निवडून आले. तरीही नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. निवडणुकीत आपण ४० नगरसेवक निवडून आणणार असल्याचा दावा केला असला, तरी प्रभाग क्रमांक १३ मध्ये विकासकामांचा अभाव असल्याने नागरिक नाराज आहेत. विकासकामांपेक्षा समस्या वाढत चालल्या आहेत.”


प्रतिक्रिया

“भोसरी मतदारसंघात विजयाचा दावा योग्य आहे, परंतु खरा विजय नागरिकांच्या समस्या सोडविल्यानंतरच होईल. मी उमेदवार म्हणून नव्हे, तर नागरिकांचा आवाज म्हणून ही मागणी करत आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने मार्गी लावावेत.”

- सचिन काळभोर,

भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता,पिंपरी चिंचवड शहर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.