चेन्नई : देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे रविवारी दीर्घ आजाराने चेन्नई येथे निधन झाले. तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन असे पूर्ण नाव असलेले शेषन 87 वर्षांचे होते. शेषन देशाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 दरम्यान या पदावर काम केले. राजकारण्यांना धडकी भरविणारा अधिकारी अशी त्यांची ख्याती होती.
शेषन यांना उतारवयात स्मृतिभ्रंश झालेला होता. कुटुंबीयांनी या कारणाने त्यांना घरापासून 50 किलोमीटरवर एका वृद्धाश्रमातठेवले होते. तीन वर्षे वृद्धाश्रमात घालविल्यानंतर ते घरी आले, पण घरात करमत नसल्याने ते संपूर्ण दिवस वृद्धाश्रमातच घालवत.
मतदार ओळखपत्रही पहिल्यांदा त्यांच्याच कार्यकाळात आले. ते 1955 च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी होते. 1989 मध्ये देशाचे केंद्रीय सचिव होते. शेषन यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाबद्दल 1996 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा सर रेमन मॅगेसेसे पुरस्कारही प्राप्त झाला होता.निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे आणि निवडणूक प्रक्रियेतील आमुलाग्र बदलांचे श्रेय शेषन यांनाच जाते. तीन-चार टप्प्यांत मतदानाची पद्धतही त्यांनीच सुरू केली.
शेषन यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 मध्ये केरळातील पलक्कड जिल्ह्यातील तिरूनेल्लई येथे झाला. भौतिकशास्त्रातून त्यांनी पदवी प्राप्त केली. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी पुढे तीन वर्षे नोकरी केली. यादरम्यान त्यांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. टी. एन. शेषन यांनी एडवर्ड एस. मॅसन शिष्यवृत्तीवर हॉवर्ड विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. जनप्रशासन या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी देशभक्त ट्रस्टची स्थापना केली तसेच 1997 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवली, या निवडणुकीत माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे दोन वर्षांनी त्यांनी काँग्रेसकडून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यातही ते पराभूत झाले होते.

