आंबेठाण (पुणे) : पुणे जिल्ह्यात जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि भावकीच्या वाटपामुळे कमी होत चाललेले जमीन क्षेत्र याचा विचार केला असता एक फूटभर जमीन देखील कोणी कोणाला सोडण्याच्या तयारीत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु, कायद्याने आपल्या वाट्याला आलेली लाखमोलाची जमीन कुठलाही मोबदला न घेता आपल्या भावाला देऊन गोनवडी (ता. खेड) येथील मोहिते कुटुंबाच्या बहिणींनी एक आदर्श घालून दिलेला आहे. त्यांच्या या बंधुप्रेमाचे समाजात आणि नातेवाइकांत कौतुक होत आहे.
गोनवडी हे चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचमध्ये येणारे गाव. गावात एमआयडीसी येत असल्याने आणि सध्या जमिनींचा मोबदला वाटप सुरू असल्याने लाखो लोकांच्या नजरा या भागात असणाऱ्या जमिनीवर आहेत.
सुमित्रा निवृत्ती पडवळ (बोरदरा), विमल लक्ष्मण कोळेकर (करंजविहिरे), सुमन पोपट पवार (बिरदवडी), इंदूबाई कैलास पवार (बिरदवडी), आशा चंद्रकांत दिवसे (कान्हेवाडी), उषा भरत भोसले (ठाकूरपिंपरी), अलका छबू बालघरे (देहूरोड) या बहिणींनी भावाला वडिलांच्या मालमत्तेततून हक्कसोड करून दिले आहे. या कुटुंबाला कायदेशीर कामात सुयोग अशोक शेवकरी यांनी मदत केली आहे.

