पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज (ता.२८) मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भुजबळ यांनीच आज पुण्यात समता भूमिवर बोलताना माहिती दिली.
महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्ताने आज आमदार छगन भुजबळ व फादर दिब्रिटो यांनी फुले वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.
आज महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनपैकी भुजबळ यांचे नाव निश्चित केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
''अदयाप मंत्रिपदाची निश्चिती झालेली नाही. विश्वादर्शक ठराव मंजूर करून घेणे हे महत्वाचे काम आहे. आता तिन्ही पक्ष एकत्र आलेत त्यामुळे हे सरकार 5 वर्ष टिकेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊ.'' असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेतली का या प्रश्नावर,''अजित पवारांबाबत निर्णय शरद पवारच घेतील'' असे सांगत ते म्हणाले ''अजितदादांनी परत यावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले. शरद पवार अजित पवारांवर जी जबाबदारी टाकतील ते ती निभावतील.

