लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशांना चारचाकी गाडीत बसवून जबरीने लुटणाऱ्या गुन्हेगारास गजाआड करीत शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने सिंघम कारवाई केली आहे. या आरोपीकडून इतरही गुन्हे पोलिसांनी उघड केले असून यातील सुमारे 11 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्ता रामदास गाडे (32 रा.गुणाट ता.शिरूर) या आरोपीने मागील महिन्याच्या 20 तारखेस न्हावरे फाटा येथुन चौफुला येथे सोडतो असे सांगून फिर्यादीस आपल्या गाडीत बसवून करडे घाटानजीकच्या डाव्या बाजूकडील कच्च्या रस्त्याला नेत त्यांच्या पर्स मधील 38 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.
पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस नाईक संजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे यांच्या पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून व रांजणगाव- शिरूर रोडला विना नंबरची स्विफ्ट कार घेऊन उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयावरून त्यास व त्याच्याकडील विनानंबराची गाडी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे काबुल केले. सदर आरोपीने अहमदनगर जिल्ह्यातील सुपा व नगर शहरातील पोलीस ठाण्याअंतर्गत ही गुन्हे केल्याचे काबुल केले असून तो अद्यापपर्यंत फरार होता. शिरूर पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीने या गुन्ह्यांतील 4 लाख 87 हजार 650 रुपयांचे दागिने पोलिसांना काढून दिले असून गुन्ह्यात वापरलेली 6 लाख रुपयांची स्विप्ट कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती ही खानापुरे यांनी दिली.

