शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपानं सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर सकाळी राजभवनात शपथविधीही पार पडला. या घटनाक्रमावर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील यांनी एक शेर ट्विट करून फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे.
शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होईल असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपानं सत्ता स्थापनेचा दावा केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विट करून फडणवीसांचं अभिनंदन केलं. "सौ सोनार की, एक लोहार की अभिनंदन देवेंद्र फडणवीस !," असं ट्विट दानवे यांनी केलं आहे.
राज्यात झालेेल्या घटना घडामोडीचा राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे. यावर शरद पवार यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. पवार यांनी स्पष्ट केलं की, कोणतीही कल्पना न देता आमदारांना राजभवनात नेण्यात आलं. विशेष म्हणजे आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचं पत्र दाखवून राजपालांची फसवणूक करण्यात आली. अजित पवारांबरोबर दहा ते बारा आमदार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर राजेंद्र शिंगणे माझ्या घरी आले. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचं समजतं आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु," असं पवार म्हणाले.

