सातारा : येत्या 15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास टोलबंद आंदोलनाचा इशारा

0 झुंजार झेप न्युज

सातारा-पुणे महामार्गाची झालेली दूरवस्था, वाढते अपघात आणि सोयी सुविधांची वानवा यावरुन जनतेमध्ये सुरु असलेला आक्रोश त्यामुळे संपप्त झालेले सातारकरांचे समाजमन यामुळे टोल का भरायचा ? सवाल करत आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत येत्या 15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास 16 दिवसापासून टोलबंद आंदोलन करण्याचा कडक इशाराच दिला.
त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे टोलविरोधी सातारकरांमधून स्वागत होत असून या बैठकीत आमदार शिवेंद्रराजेंनी महामार्ग प्राधिकरणाची अधिकाऱयांना व ठेकेदारांना वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवा, असा भीमटोला लगावला.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्सचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीस आमदार शिवेंद्रराजेंसह टोल विरोधी सातारी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणीस, रिलायन्स कंपनीचे गांधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आमदार शिवेंद्रराजेंचे आक्रमक रुप अनुभवयास मिळाले. त्यांनी महामार्गाची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची दुरुस्ती होत नसेल तर टोल का भरायचा असा सवाल करत अधिकाऱयांची बोलतीच बंद केली. यावेळी चर्चेअंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी येत्या 15 दिवसात महामार्गाची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा शब्द दिला. यावेळी आमदार शिवेंद्रराजेंनी 15 दिवसांत महामार्ग, सेवा रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती न झाल्यास 16 व्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच तुम्हाला जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, असे खडे बोल सुनावले. पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवा, असा सज्जड इशारा दिला. आमदार शिवेंद्रराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. यावरच न थांबता त्यांनी रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून महामार्ग दुरुस्ती आणि आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याबाबत सकारात्मक चर्चा करुन तसे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांना देण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकाऱयांनी यावर बैठक बोलावून यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
महामार्ग अधिका-यांची बोलती बंद ==आमदार शिवेंद्रराजेंनी महमार्गाची आणि सेवा रस्त्यांची दुरावस्था, खड्डेd यामुळे होणारे अपघात, जीवीत आणि वित्त हानी याबाबत आक्रमक भुमिका मांडतानाच महामार्गावर सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचेही सांगितले. घमासान चर्चेनंतर आ. शिवेंद्रराजे यांनी महामार्ग, सेवा रस्त्यांवरील खड्डे भरणार आहात का नाही? असा खडा सवाल करुन अधिकाऱयांची बोलती बंद केली.
२० किलोमीटर परिघातील लोकांना सवलत पास द्या..पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. टोलबंद आंदोलनाबाबत सांगितल्यानंतर त्यांनी आनेवाडी टोल नाका येथून २० किलोमीटर परिघात येणार्‍या सर्व गावातील वाहनचालकांना सवलत पास देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या सर्व गावातील वाहनचालकांनी सवलत पास घेतले नसतील तर ते घ्यावेत. संबंधीत अधिकार्‍यांनी या लोकांना सवलत पास द्यावेत. यामध्ये सुध्दा बोगसगिरी चालू असल्याचे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मी स्वत: सवलत मिळणार्‍या गावांची यादी घेवून ती प्रसारमाध्यमांच्याद्वारे प्रसिध्द करणार असल्याचे जाहिर केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.