अश्‍विनी भिडे यांची अखेर उचलबांगडी

0 झुंजार झेप न्युज

मुंबई - गोरेगाव येथील आरेमध्ये मेट्रो-3 च्या कारशेड उभारण्यासाठी एका रात्रीत झाडांची कत्तल करून चर्चेत आलेल्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, भिडे यांची बदली करताना त्यांना कोणतेही खाते दिलेले नाही. तर दुसरीकडे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.
पुणे साखर आयुक्त एस. एन. गायकवाड यांना पुणे महापालिका आयुक्त तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षक ए. एम. कवडे यांना सहकार सोसायट्यांच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याजागी साखर आयुक्त म्हणून पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय सचिव एस. एस. डुंबरे यांची मेडाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात घाऊकपणे तब्बल 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी आणखी 20 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासनात खांदेपालट केला आहे. भाजप सरकारच्या काळात अनेक वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. धडाकेबाज कार्यशैलीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेत बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई, नाशिक महापालिकेत त्यांची कारकिर्द गाजली होती.
पुणे परिवहन प्रधिकरणात वादग्रस्त ठरल्यानंतर मुंढेची बदली महाराष्ट्र राज्य एडस्‌ कंट्रोल सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी करण्यात आली होती. आता ठाकरे यांनी मुंढेंवर नागपूर महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव राजीव निवतकर यांची नियुक्ती झाली आहे.
एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची ग्रामीण विकास आणि जलसंधारण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डी. टी. वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण वैंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्युत पारेषणच्या संचालकपदी असलेल्या पराग जैन-नैनुत्तीया यांना सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. मत्स्यविभाग आयुक्त आर. आर. जाधव यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सचिवपदी करण्यात आली आहे. तर उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यंना मराठी भाषा विभागच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.
मुंबईचे जिल्हाधिकारी एस.आर. जोंधळे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेडाचे महासंचालक के. बी. उमप यांची उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ए. ई. रायते यांची अतिरिक्त आयुक्त जमावबंदी आणि भूमिअभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रीकर सहआयुक्त म्हणून संपदा मेहता यांची तर अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू. ए. जाधव यांना अकोल्यात नियुक्त करण्यात आले आहे. कृषिविभागाचे उपसचिव किरण पाटील यांना सामान्य प्रशासन सचिव कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.