पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या 'युनिट एक'ने चिंचवड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारला. यामध्ये तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) दुपारी करण्यात आली.
शॉम्पा कौशिक घोष (वय 34, रा. मारुंजी, ता. मुळशी), अभिजित शिंगोटे पाटील (रा. डांगे चौक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार उषा दळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौकाजवळ असलेल्या सुमन मॉलच्या पहिल्या मजल्यावर सिटी सृष्टी मसाज सेंटर नावाने मसाज सेंटर सुरु होते.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली. एका महिलेसह दोन जणांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 370, 34 आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

