पिंपरी (zunjarzep. In):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रूपीनगर परिसरातील आणखी तिघेजण कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आज (दि.२७) प्राप्त झाला. रुपीनगर परिसरात आत्तापर्यंत १६ बाधित रुग्ण आढळले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेने रविवारी (दि.२६) ११६ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये रुपीनगर परिसरातील रहिवाशी असलेल्या २८ आणि २६ वर्षीय दोन पुरुषांचे तसेच २५ वर्षाच्या एक महिलेचे, असा एकूण तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हायरिस्क कॉन्टॅक्टमधून त्यांना करोनाची लागण झाली आहे. २४ एप्रिल रोजी एकच दिवशी रुपीनगर परिसरातील तब्बल १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. २३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधून ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. आजपर्यंत या परिसरातील १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६० वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात २८ जण करोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.

