पिंपरी (zunjarzep.in):- पिंपरी चिंचवड या औद्योगिकनगरीत परराज्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांचे रेशनकार्ड मूळगावी आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत या नागरिकांना आधारकार्डचा पुरावा ग्राह्य धरुन रेशनिंगवर धान्य वाटप करावे अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगर म्हणून ओळखले जात आहे. बाहेरील राज्यातून असंख्य कामगार रोजगाराच्या शोधात शहरात आहेत. अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय शहरामध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्यावर सद्यस्थितीला उपासमारीची वेळ आलेली आहे. बर्याचश्या परप्रांतीय नागरिकांची शिधापत्रिका त्यांच्या मूळ गावाकडील असल्यामुळे दोन वेळचे अन्न देखील मिळणे मुश्किल झाले आहे. अशा सर्व नागरिकांना महाराष्ट्र राज्याने केशरी शिधाधारकांना ठरवून दिलेल्या नियम व अटी लागू धरून फक्त आधार कार्ड हा पुरावा ग्राह्य धरून धान्य पुरवठा करण्यात यावा अशी विनंती संदीप वाघेरे यांनी केली आहे.

