Pimpri : वडील अमेरिकेत अडकल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी साजरा केला 15 वर्षीय मुलाचा वाढदिवस

0 झुंजार झेप न्युज

Pimpri ( zunjarzep. In)  : वडील अमेरिकेत अन मुलगा सांगवीत.मुलाचा वाढदिवस असल्यामुळे वडिलांनी मुलाला संपर्क केला, पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे वडिलांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे आपली अडचण सांगितली आणि आपल्या वतीने मुलाला शुभेच्छा देण्याबाबत विनंती केली. पोलिसांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन वडिलांच्या शुभेच्छा मुलापर्यंत पोहोचवल्या. वडील आणि मुलांमध्ये पोलिसांनी केलेल्या या अनोख्या मध्यस्थीची शहरात सकारात्मक चर्चा रंगली आहे.
वत्सल शर्मा असे बर्थडे बॉयचे नाव आहे. त्याचे वडील शर्मा हे अमेरिकेत आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने शर्मा यांना भारतात येता आले नाही. त्यात वत्सलचा आज वाढदिवस होता. वडिलांनी वत्सलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपर्क केला. पण तांत्रिक अडचणींमुळे संपर्क होऊ शकला नाही.
पोलीस समाजाच्या प्रत्येक घटकाशी जवळीक साधतात. नागरिकांच्या मर्यादित सुखांमध्ये तर अमर्यादित दुःखात पोलीस सोबत असतात. याची प्रचिती क्षणाक्षणाला येते. शर्मा यांनी देखील पोलिसांच्या मदतीने त्यांच्या शुभेच्छा आपल्या मुलापर्यंत पोहोचविण्याचे ठरवले. शर्मा यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना अमेरिकेतून ई-मेल केला. त्यामध्ये आपल्या मुलाचा वाढदिवस असून त्याला शुभेच्छा देण्यास अडचण होत असून माझ्या वतीने आपण शुभेच्छा द्याल का, अशी विनंती केली.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वडील आणि मुलगा यांच्यात मध्यस्थी करून शुभेच्छा पोहोचविण्यास पुढाकार घेतला. आयुक्तांनी सांगवी पोलिसांना सूचना दिल्या. सांगवी पोलीस रात्रीच वत्सलच्या सांगवी येथील घरी केक घेऊन पोहोचले. त्यानंतर फिजिकल डिस्टन्स पाळून वत्सलचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला. त्याला शुभेच्छाही दिल्या, वडिलांच्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोहोचवल्या. लॉकडाऊनच्या काळात असे अनपेक्षित गिफ्ट त्याला मिळेल, अशी किंचितशी कल्पना नसताना त्याला हा आनंद मिळाल्याने वत्सल आनंदी झाला.
वत्सल म्हणाला, माझा हा वाढदिवस अतिशय स्पेशल झाला आहे. मला याची कल्पना देखील नव्हती. असे म्हणत त्याने सर्व पोलिसांचे आभार देखील मानले.
सांगवीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले, नागरिक आम्हाला त्यांच्यासोबत सहभागी करून घेत आहेत. याचा आनंद आहे. जनतेच्या भावनेशी जुळण्याचा हा अनोखा प्रसंग आहे. पोलीस नागरिकांच्या भावना समजून घेत आहेत. नागरिकांनी देखील पोलिसांच्या भावना समजून घ्याव्यात. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अमेरिकेतील वडिलांनी मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबाबत ई- मेल द्वारे पोलीसांना विनंती केली होती. त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड तर्फे सामाजिक भान जपण्याचा अनोखा प्रयत्न @DGPMaharashtra @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoDivPune
87 people are talking about this



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.