दीड कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक आणि भाजप नेते रत्नाकर ज्ञानदेव पवार आणि अशोक तूळशीराम अहिरे यांना पुणे कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यामध्ये व्यवसायात एकत्र भागीदारी करून मोठा मोबदला देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या मोहद्दीस महंमद फारुख बखला( वय 36) यांनी फिर्याद दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी रत्नाकर पवार यांच्यासह इतर साथीदारांवर कारवाई केली आहे. याप्रकरणात काही जणांना अगोदरच अटक करण्यात आली आहे.
रत्नाकर पवार हे नाशिकमधील भाजपचे नेते आहेत. त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यास यश आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

