नागपुरात 24 तासांत तीन हत्या, इमारतीचा सुरक्षारक्षक आणि ठवकर टोळीच्या दोघांचा खून

0 झुंजार झेप न्युज

 

नागपुरात 24 तासांत तीन हत्या, इमारतीचा सुरक्षारक्षक आणि ठवकर टोळीच्या दोघांचा खून

 नागपुरात हत्येच्या तीन घटना घडल्या असून गेल्या एका आठवड्यात नागपूर शहर आणि जिल्ह्यात हत्येच्या सात घटना घडल्या आहे.



नागपूर : गुन्हेगारीसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नागपूरात गुन्हेगारांनी दिवाळी ही रक्तरंजित केली आहे. कारण कालपासून नागपुरात हत्येच्या तीन घटना घडल्या असून गेल्या एका आठवड्यात नागपूर शहर आणि जिल्ह्यात हत्येच्या सात घटना घडल्या आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यांत गुन्हेगार बेलगाम झाल्याचे चित्र आहे.


नागपुरातील उप्पलवाडी परिसरात एका बिल्डरच्या इमारतीत वृद्ध चौकीदाराची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. संतोष श्रीवास्तव असे हत्या झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. 60 वर्षीय संतोष श्रीवास्तव अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत चौकीदारी करायचे. इमारतीत चोरीच्या किंवा मद्यपान करण्याच्या उद्दिष्टाने घुसलेल्यांनी त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. दरम्यान हत्या करुन मारेकरी फरार झाले आहेत.


आणखी एका हत्येनं नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपुरात आज सकाळी दुहेरी हत्याकांड झाल्याचे उघड झाले. नागपूर जवळच्या पाचगाव पासून 2 किमी अंतरावर नागपूर-कुही मार्गावर दोघांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकल्याचे सकाळी समोर आले. पाचगाव पासून कुहीच्या दिशेने 2 किमी अंतरावर सकाळी रस्त्यावरून येणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोड्यात पडलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोघांना धारदार शस्त्राने मारल्याचे स्पष्ट झाले. दोघांची ओळख पटली असून त्यांची नावे कृनाल ठाकरे आणि सुशील बावणे अशी आहेत. घटनास्थळी भांडणाची, झटापटीची कोणतीही खुणा नसल्याने दोघांची इतरत्र हत्या करून पाचगाव जवळ आणून फेकल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दोघे ही नागपूरच्या कुख्यात ठवकर टोळीचे हस्तक असून हे गुन्हेगारांमधील गँगवारचे प्रकार असल्याची दाट शक्यता आहे.


विशेष म्हणजे काल कपिल नगर पोलीस स्टेशनच्या उप्पलवाडी परिसरात एका वृद्ध चौकीदाराची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्याचे आरोपी अजून पकडले गेले नसताना आता गँगवारमध्ये हे दुहेरी हत्याकांड झाले आहे. गेल्या आठवड्यात ही हिंगणा, एमआयडीसी, प्रतापनगर परिसरात हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागपुरात दिवाळीच्या काळात ही गुन्हेगारी थांबलेली नसून उलट गँगवार उफाळून आल्याने दिवाळी रक्तरंजित झाली आहे. दिवाळीच्या काळात सात दिवसात नागपूर शहर आणि जिल्हा मिळून हत्येच्या सात घटना घडल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.