दोन्ही आमदार व निष्ठावंतांना शह देत मुंडे गटाचे केशव घोळवे झाले बिनविरोध उपमहापौर…
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी दाखल केलेला अर्ज आज माघार घेतला आहे.
पंधरा मिनिटे अर्ज माघारसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ दिला होता. पक्षनेते नामदेव ढाके यांनी अर्ज माघार घेण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार यांना विनंती केली. तसेच राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे कदम यांनी अर्ज माघार घेतला. राष्ट्रवादीची डाळ अखेर शिजलीच नाही. तसेच दोन्ही आमदारांना घोळवे यांच्या निवडीमुळे मोठी चपराक बसली आहे.
महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पहिले.

