बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणारे पिता-पुत्र ठार; पैठणच्या आपेगाव शिवारात भीतीच वातावरण
पैठण : पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात शेतात काम करणारा मुलगा व त्याच्या वडीलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही ठार झाल्याची घटना रात्री ८ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. घटना समजताच वन खात्याचे अधिकारी व पैठण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आपेगाव शिवारात गोदावरी काठालगत असलेल्या शेतात गेलेले कृष्णा औटे व अशोक औटे रात्र झाली तरी घरी परतले नाही. यामुळे शेतात त्यांना पाहण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह आढळून आले. या बाबत पैठण पोलीसांना गावकऱ्यांनी खबर दिली. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली व तातडीने घटनास्थळी जात गावकऱ्यांना दिलासा दिला. दरम्यान गतवर्षी सुध्दा याच परिसरात एका शेतकऱ्याचा बीबट्याने बळी घेतला असल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे

