शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, दहशतवादी हल्ल्यात चाळीसगावच्या सुपूत्राला वीरमरण
दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं.
जळगाव : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं. शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी दाखल झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दाखल झाले. त्यासाठी खास हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीतून त्यांचे पार्थिव नाशिक येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आठ वाजता पिंपळगाव येथे दाखल झाले.
शहीद जवान यश देशमुख यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थही पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या वीर मुलाची वाट पाहत आहेत. कडाक्याच्या थंडीत देखील अनेक लोक रात्रभर जागी होती. हुतात्मावीर यश देशमुख यांच्या पार्थिवाला अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी असंख्य नागरिक जमा झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 22 वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख यांना वीरमरण आले.
यश देशमुख हे 11 महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते. यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते.
यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

