वीज बिलावरून भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही, प्रकाश आंबेडकरांची टीका

0 झुंजार झेप न्युज

 

वीज बिलावरून भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही, प्रकाश आंबेडकरांची टीका

आमचं सर्वसामान्य नागरिकांना आवाहन आहे की, वीज बिल भरू नये. वीज मंडळाने पुरवठा खंडित केल्यास आम्ही ग्राहकांच्या वीज जोडण्या पूर्ववत करू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबई : भाजप सध्या राज्यभरात वीज बिलावरून आंदोलन करत आहे. परंतु त्यांना आंदोलन करण्याचा कसलाच नैतिक अधिकार नाही. भाजपच्या काळातच मोठ्या प्रमाणात वीज बिलांची थकबाकी झाली आहे, अशी टीका आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासोबतच सध्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलात सवलत देऊ असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. त्याबाबतचा प्रस्ताव देखील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. परंतु तो प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी दाबून ठेवला आहे. हा प्रस्ताव दाबण्याचा अधिकार अजित पवार यांना कोणी दिला असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.


जर अशी बाब समोर येत असेल तर मग राज्य नेमकं चालवतं कोण आहे? महाराष्ट्र राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे की अजित पवार असा सवाल देखील आंबेडकरांनी उपस्थित केला. त्यामुळे आता सरकारने वीज बिलात सुट द्यावी. अन्यथा आमचं सर्वसामान्य नागरिकांना आवाहन आहे की, वीज बिल भरू नये. वीज मंडळाने पुरवठा खंडित केल्यास आम्ही ग्राहकांच्या वीज जोडण्या पूर्ववत करू, असं आंबेडकर म्हणाले.


प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटलं की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे विरोधकांच्या अजेंड्यावर चालणारे सरकार आहे. सध्या उद्धव ठाकरे सरकार चालवत आहे की अजित पवार असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः काही बाबतीत निर्णय घेण्याची गरज आहे. तसे होताना दिसत नाही. सध्या विरोधक मागणी करतात मग त्या मागणीचा पाठपुरावा सरकार करते. महावितरण कंपनीने कोरोना संकटात जनतेला विज बिलात 50 टक्के सुट देण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्या संदर्भातील एक फाईल आणि त्यावरील शेरा हा विचारात घेण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला विज बिलासंदर्भात मोठा दिलासा द्यावा. पण, या संदर्भातील ती फाईल राज्याचे अर्थमंत्री यांनी दाबल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


राज्याच्या उर्जामंत्र्यांना महावितरण कंपनीने सुट देण्यासंदर्भात आणि ती सुट दिल्याने कुठलाही फरक पडणार नाही, असा शेरा असलेली फाईल दिली होती. त्यामुळे पहिले सुट देण्याची घोषणा केल्या गेल्या. परंतु आता पुर्ण वीज बिल भरण्याचा आदेश उर्जामंत्री देत आहे. अशा वेळी राज्यातील जनतेच्या पाठिशी वंचित बहुजन आघाडी राहणार आहे. जनतेने वीज बिल भरु नये. वीज बिल न भरल्यास जोडणी तोडल्यास वंचित ही जोडणी पुन्हा जोडून देईल, अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी दिली. वीज बिल माफी संदर्भात राज्यातील उर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.