वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात बिजलीनगर महावितरण कार्यालय येथे आंदोलन

0 झुंजार झेप न्युज

 वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात  बिजलीनगर महावितरण कार्यालय येथे आंदोलन

पिंपरी चिंचवड - लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली. त्यात कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, असे असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली आहे. सरकारची ही भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज प्रभाग क्रमांक १७ बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, करुणाताई चिंचवडे, संगिताताई भोंडवे, स्वीकृत प्रभाग सदस्य बिभीषण चौधरी, शेखर चिंचवडे, महिला मोर्चा मंडल अध्‍यक्षा पल्लवीताई वाल्हेकर, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, सरचिटणीस प्रदीप पटेल, अशोक बोडखे, रविंद्र ढाके, तेजस खेडेकर,‍ शिरीष कर्णिक, वसंत नारखेडे, संजय जगदाळे, सचिन वाणी, मुरलीधर चोपडे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

 पिंपरी चिंचवड शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोरोना प्रादुर्भाव असताना बहुतांशी कामगार आपली घरे बंद करून आपल्या मूळगावी गेली होती. त्यांच्या बंद असलेल्या घरात वीज पुरवठयाचे हजारो रुपये वीजबिले आली आहेत. तसेच बंद व्यावसायिक-दुकानदार यांना सुध्दा लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वीजबिले आली आहेत. तर अनेक ठिकाणी मीटर तपासणी न करता ग्राहकांना मनस्ताप देणारे ॲवरेज बीले पाठविण्यात आली आहेत. विजबिलात आकारणी केलेली रक्कम फार मोठ्या प्रमाणात असल्याने ती किमान कमी केली तरी नागरिकांना दिलासा मिळू शकतो, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. याबाबत वीज कंपनी आणि सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने वीज ग्राहकांना वीजबिल माफी दयावी, या मागणीसाठी आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रभाग क्रमांक १७ बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शाखा अभियंता कल्याण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्‍यात आले. 

या आंदोलनाबाबत नामदेव ढाके म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकही काळजी घेवुन कोरोनाशी लढत आहे. शहरातील नागरिकांची कोविड-१९ मुळे आर्थिक परिस्थितीसुध्दा बिकट झालेली आहे. अशा परिस्थितीत वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडे नगर, गिरिराज सोसायटी, शिवनगरी, दळवीनगर, प्रेमलोक पार्क या परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात वीज बीले आली असुन नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. या महामारीच्या काळात नागरिकांनी या कामासाठी विद्युत मंडळाच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारणे हे अत्यंत धोक्याचे असुन ते कोरोना विषाणूस आमंत्रण देण्यासारखे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन वीज दर कमी करुन दुरुस्त वीज देयके देणे आवश्यक वाटते, त्यासाठीच हे आंदोलन करावे लागले. तरी तातडीने या परिसरातील सर्व वीज मिटरची तपासणी करुन तसेच वीज दर कमी करुन दुरुस्ती वीज बील देणेबाबत कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.