IPL 2020 | सूर्यकुमार यादवचं संघासाठी बलिदान, रोहित शर्मासह नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
सूर्यकुमार यादवनं रोहित शर्मासाठी धावबाद होऊन सर्व चाहत्यांसह रोहित शर्माचं मनं जिंकलं आहे.
दुबई : आयपीएलच्या (IPL 2020) च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईनं पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माची फलंदाजी आणि ट्रेंट बोल्ट याची गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी केली. मात्र, सूर्यकुमार यादवनं रोहित शर्मासाठी धावबाद होऊन सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सूर्यकुमारच्या याकृतीमुळं त्याचं कौतुक होत आहे. रोहित शर्मानेही सूर्यकुमारचे कौतुक केले आहे.
दिल्ली कपिटल्सनं दिल्लीसमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले होते. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या दोघांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली होती. डिकॉक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात फलंदाजीसाठी आला होता. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांची भागिदारी सुरु असताना 11 व्या षटकामध्ये रोहित शर्मानं एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूर्यकुमार यादव धाव घेण्याच्या तयारीत नव्हता त्यानं क्रीज सोडलेले नव्हते. मात्र, रोहित शर्मा नॉन स्ट्राइकर्स एंडवर पोहोचला. यावेळी रोहित शर्मा धावबाद होण्याची शक्यता होती. यानंतर सूर्यकुमारनं रोहित शर्मा आणि टीमसाठी क्रीज सोडत धावबाद होण्याचा निर्णय घेतला.
सूर्यकुमार यादवचं कॉमेंटेटर्सनी कौतुक केलं. सोशल मीडियावरही त्याचं मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे. रोहित शर्मानं “सूर्यकुमार यादवसाठी मला बाद व्हायला हवं होतं”, असं म्हटलं. “ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये तो होता, मला सूर्यकुमारसाठी माझी विकेट बलिदान करायला पाहिजे होती. पूर्ण हंगामात त्यानं शानदार फटके लगावले होते”. असं रोहित शर्मा म्हणाला.
IPL 2020 मध्ये सूर्यकुमार यादवनं अंतिम सामन्यात 19 धावा केल्या. मात्र, मुंबईसाठी या हंगामात सूर्यकमारनं जोरदार फलंदाजी केली. 15 मॅचमध्ये त्याने 480 धावा केल्या, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबईचा 5 विकेटसनी विजय
दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. इशान किशनने नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 56 धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.