वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 8 कोटी 17 लाख 72 हजार 669 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची (Corona Patients) संख्या कमी होऊ लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती (Corona virus New Strain) सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत दिलासादायक माहिती सादर केली, त्यानुसार जवळपास सहा महिन्यांनंतर देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची (Active Corona Patients) संख्या 2.7 लाखांच्या खाली गेली आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी तीन टक्क्यांहून कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशात लवकरच कोरोनावरील लसीकरण सुरु होणार आहे. त्याआधीच एक सकारात्मक बातमी समोर आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, देशात तब्बल 187 दिवसांनंतर दररोज नव्या आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्यादेखील कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज 16 हजार 500 हून कमी नव्या बाधित रुग्णांची नोंद केली जात आहे. 25 जून रोजी देशात 16 हजार 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर गेल्या 24 तासात देशात 16 हजार 432 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 68 हजार 581 इतकी आहे.
या पत्रकार परिषदेदरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात देशातील कोरोना पॉझिटिविटी रेट 2.5 टक्के होता. प्रति मिलियन लोकसंख्येच्या तुलनेत देशात इतर देशांच्या तुलनेत खूप कमी रुग्ण आहेत. देशात सध्या जितके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 60 टक्के रुग्ण हे पाच राज्यांमध्ये (केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड) आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात एकाच दिवसात सर्वाधिक 4501 कोव्हिड रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर केरळमध्ये एकाच दिवसात 4172 कोव्हिड रुग्ण बरे झाले आहेत.
जगभरात 8 कोटी 17 लाख कोरोनाबाधितांची नोंद
वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 8 कोटी 17 लाख 72 हजार 669 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 79 लाख 35 हजार 86 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 84 हजार 244 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 20 लाख 53 हजार 338 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 97 लाख 81 हजार 718 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 16 लाख 96 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 लाख 43 हजार 182 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 24 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 98 लाख 7 हजार 959 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 48 हजार 190 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश
अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 19,781,718, मृत्यू – 343,182
भारत : एकूण कोरोनाबाधित – 10,224,797, मृत्यू – 148,190
ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 7,506,890, मृत्यू – 191,641
रशिया : एकूण कोरोनाबाधित – 3,105,037, मृत्यू – 55,827
फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,562,646, मृत्यू – 63,109
यूके : एकूण कोरोनाबाधित – 2,329,730, मृत्यू – 71,109
तुर्की : एकूण कोरोनाबाधित – 2,162,775, मृत्यू – 20,135
इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,964,054 , मृत्यू – 69,214
स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,830,110, मृत्यू – 49,260
अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,547,138, मृत्यू – 41,997

