रवींद्र जडेजा टीम इंडियाचा नवा संकटमोचक, सध्याच्या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू

0 झुंजार झेप न्युज

जाडेजाला दुसऱ्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या जागी स्थान देण्यात आले. जाडेजाने या संधीचा फायदा घेतला

मेलबर्न : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (AUS vs IND, 2nd Test) मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात (Boxing Day Test) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 70 धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांनी अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळेच टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळवता आहे. दरम्यान पहिल्या कसोटी साम्यात संधी न मिळालेल्या अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही या सामन्यातील कामगिरीद्वारे सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या जागी के. एल. राहुलला संधी दिली जावी, असा सल्ला अनेकांनी दिला होता. अनेकांना वाटत होते की, या सामन्यात विराटऐवजी राहुल मैदानात उतरेल, परंतु अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी दिली. रहाणेचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. जाडेजाने फलंदाजीसह गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. रहाणे आणि जाडेजा या जोडीने पहिल्या डावात सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी या सामन्यात निर्णायक ठरली. या भागीदारीमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 131 धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात फलंदाजी करताना जडेजाने 57 धावांची खेळी केली होती. तसेच जाडेजाने गोंलदाजी करताना पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 3 विकेट्स घेत भारतीय गोलंदाजांना चांगली साथ दिली.

जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव ODI विजयाचा नायक

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील रवींद्र जडेजाचं कौतुक केलं आहे. शास्त्री एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, “जडेजा एक ‘जेनुइन ऑलराऊंडर’ आहे. या ऑस्ट्रेलिया दोऱ्यात जडेजा जेव्हा-जेव्हा मैदानात उतरला आहे, तेव्हा त्याने कमाल केली आहे”. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जडेजा सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीला एकदिवसीय मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव झाला होता. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला होता. या सामन्याचा नायक जडेजाच होता. या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने हार्दिक पांड्यासह चांगली भागिदारी करत भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. त्याने 50 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती.

जडेजाच्या येण्याने टीम इंडिया बदलली

पहिल्या टी-20 सामन्यात जडेजाने 23 चेंडूत 44 धावांची खेळी केली होती. त्याच्या याच खेळीच्या जोरावर भारताने तो सामना जिंकला. या सामन्यात जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पुढील सामना खेळू शकला नाही. त्यानंतर थेट मेलबर्न कसोटीत त्याचं पुनरागमन झालं. जडेजाच्या पुनरागमानंतर टीम इंडिया बदलल्याचं जाणवत होतं. कारण अॅडलेड कसोटीत अर्धा डझन कॅचेस (झेल) सोडणारी टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करत असताना वेगळीच दिसली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाने एक अत्यंत अवघड कॅच पकडला होता. त्यामुळे मॅथ्यू वेडला पव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. जडेजाच्या या कॅचनंतर टीम इंडियाने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं.

गेल्या चार वर्षांपासून यशस्वी अष्टपैलू खेळाडू

जाडेजा 2016 पासून कसोटी क्रिकेटमधील यशस्वी अष्टपैलू खेळाडू आहे. जाडेजाने 46.29 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच जाडेजाची गोलंदाजी करताना 24.97 इतकी सरासरी राहिली आहे. ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा बेन स्टोक्स तर तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या शाकिब अल हसन आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.