भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केलेल्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (26 डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केलेल्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय. आपण पुण्यात स्थायिक होणार नसून मी कोल्हापूरला जाणार असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता त्यांनी मी कोल्हापूरला जाणार असल्याच्या वक्तव्यानंतर कुणीही हुरळून जाऊ नये, घाबरुन जाऊन नये असं स्पष्टीकरण दिलंय. माझ्या वक्तव्यांवर उलटसुलट चर्चा झाल्यानेच आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचं त्यांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझ्या कोल्हापूरमध्ये परतण्याच्या वक्तव्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळेच मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. माझ्या त्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरुनही जाऊ नये. मला ते बोलताना इतकी चर्चा होईल असं वाटलं नाही. माझं वाक्य असं होतं की केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असंच पुण्यात पाठवलेलं नाही.”
“माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं. त्यासाठी माशेलकरांना गिरीश बापट यांनी पुणं सेटल होण्यासाठी चांगलं असल्याचा सल्ला दिला. त्यावर मी म्हटलं की पुणं खूप चांगलं आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या कोल्हापूरला जाईल. त्यासाठी 5,15 किंवा 20 वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे :
– मी कोल्हापूरला परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये, घाबरून जाऊ नये.
– केंद्राने मला सहजासहजी पाठवलं नाही.
– माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही.
– 1980 ते 1993 या काळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडलं होतं.
– पुढच्या निवडणुकीला अजून खूप वेळ आहे
– मला सेटल व्हायला 2200 लोकसंख्येचे खालापूर आवडेल
– अजित पवारांना काय पडलय आमचं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, त्यांनी शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं
– मला माझा पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचे
– कोल्हापुरात तीन पक्ष वेगळे लढतात हे नाटक आहे, ते सगळे एकत्र आहेत
– अजून दोन महापौर यायचेत, मला फक्त कोथरूडची निवडणूक लढवण्यासाठी पाठवलं नाही, मला जे करायचयं ते खूप मोठं आहे
– कालचा संदर्भ हा लगेच बॅग उचलून जाण्याचा नाही

