महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांच्या वर्णीची शक्यता, कारकीर्दीवर एक नजर

0 झुंजार झेप न्युज

 पोलीस महासंचालकपदासाठी संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं चर्चेत आहेत.

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळेंच्या कारकीर्दीत अनेक चढउतारही आले. 

सुबोध जैस्वाल यांच्या बदलीनंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या पदासाठी चार वरिष्ठ IPS अधिकारी मैदानात आहेत. संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं चर्चेत आहेत. परंतु नगराळे यांचे पारडे जड मानले जाते.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जैस्वाल यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. परंतु पांडे जून 2021 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या हेमंत नगराळेंची वर्णी निश्चित मानली जाते.

हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे यांची कारकीर्द

नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

हेमंत नगराळे आणि वाद

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मार्च 2018 मध्ये हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते. 

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात तक्रार

नगराळेंच्या कार्यकाळात पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण हेमंत नगराळे यांनी काढून घेतले होते. या प्रकरणी बिल्डरने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयाने नगराळेंना झापलेही होते.

महासंचालकपदाच्या शर्यतीत कोण कोण?

1) संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड

2) हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान

3) सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग

4) रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोधकुमार जैस्वाल यांची आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.