पुणे महापालिकेच्या कार्यक्रमात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत.

0 झुंजार झेप न्युज

पुणे महापालिकेच्या कार्यक्रमात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत.

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नव्या वर्षात पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत आहेत. भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

पुण्यातील भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनावरुन महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यानंतर सत्ताधारी विरोधकांनी मध्यम मार्ग स्वीकारत देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात 1 जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे.

कोरोना सेंटरच्या कार्यक्रमात एकत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली होती.

माझा आवाज कोणी दाबू शकत नाही: देवेंद्र फडणवीस

कोरोना सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.

अजित पवारांची टोलेबाजी

“देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही येणार आहेत म्हणून” अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.