पुण्यात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या अयोध्या या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. गोविंदगिरी महाराज आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं.
पुणे : “14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही”, अशा शब्दात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पुण्यात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. गोविंदगिरी महाराज आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी काँग्रेसला टोला लगावला.
“अयोध्या हे शिकण्याचं केंद्र आहे. मंदिराला दिव्यत्वाची सीमा नसणार आहे. राम मंदिराचा संघर्ष हा रोमांचक आहे. संन्याशांनी, नागा साधू आणि तीन लाख लोकांनी बलिदान दिलं आहे. राम हा देशाचा कस आणि बळ आहे. जोपर्यंत रामाचं चिंतन आहे, तोपर्यंत हा देश बलवान आहे”, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
“छपत्रतींच्या प्रतिमेचा काहींनी मेकअप केलाय. तर काहींची मुळ प्रेरणा आहे. राजनीतीचं हिंदूकरण आणि हिंदूचं सैनिकीकरणाची प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
आक्रमकांनी दोन गोष्टी पाहत आक्रमण केलं : चंद्रकांत पाटील
“6 डिसेंबर 1992 नंतर बाबरी मस्जिद पाडल्यावर इतर ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळाले. नंतर जम्मू काश्मीर आणि देशात विविध ठिकाणी मंदिर पाडली गेली. रामजन्मभूमी ही मंदिर नाही तर स्वाभिमानावर झालेला आघात आहे. आक्रमकांनी दोन गोष्टी पाहत आक्रमण केलं एक म्हणजे मंदिर आणि दूसरी स्त्री. कारण आपल्या समाजात या दोन गोष्टींवर खूप श्नद्धा आहे. त्यांनी हिंदू समाज मोडून काढण्याचं काम केलं. आम्ही त्याला प्रत्युत्तर देत आहोत”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
“अनेक जण टीका करतील. त्यांना पुन्हा एकदा त्यांना आधीचं राज्य आणायचंय. मात्र मंदिर हे नवनिर्माणाचं केंद्र आहे. आमच्या अस्मितेवरचा घाला घातला गेला. त्याला आम्ही मंदिर उभारून प्रत्युत्तर देणार आहोत. एक लाख रुपयांचा निधी देणाऱ्यांना अयोध्या हे पुस्तक मोफत भेट दिलं जाईल”, असंदेखील पाटील यावेळी म्हणाले.
“गेली चाळीस-पन्नास वर्षे रामजन्मभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. रामजन्मभूमी, रामजन्मभूमी आंदोलन, संघटना यांना बदनाम केलं. खरंतर ही एक वैचारिक लढाई आहे”, असं मत माधव भंडारी यांनी यावेळी मांडलं.

