बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. पीडित तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.
बीड : बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीडमधीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोपट बोबडे असं 27 वर्षीय आरोपीचं नाव असून तो बीडमधील महालक्ष्मी चौक, रामनगर येथील रहिवाशी आहे.
पीडित मुलीचे आई-वडील 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारात किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. घरी वृद्ध आजोबा असल्याने पीडित मुलगी घरी होती. मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आली असता आरोपी पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला. परंतु हा वार तिने हातावर झेलला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

