BJP तून NCP त प्रवेश केल्यानंतर ED च्या नोटिसाही सोबत येतात; चाकणकरांचा भाजपला टोला

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती.

पुणेः ”भाजपच्या नेत्यांना ईडीच्या नोटिसा येत नाहीत, ईडीच्या नोटिसा या फक्त राजकीय हेतूनेच प्रेरित होऊन येतात, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या प्रवेशात सोबत ईडीच्या नोटिसाबरोबर येतात”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजपवर केलीय, त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या पंढरपूर दौऱ्यावर जात असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पोपट शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी रुपाली चाकणकर आल्या असता, त्या पत्रकारांशी बोलत होत्या. चाकणकर म्हणाल्या,” गेल्या वर्षभरापासून ईडीच्या नोटिसा येत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती, केवळ राजकीय हेतूने आणि आकसापोटी या नोटिसा पाठविल्या जातात. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या प्रवेशापाठोपाठ ईडीची नोटीस येते आणि विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ईडीची नोटीस येत नाही हे सर्वसामान्य लोकांना समजते. त्यामुळे या पाठीमागे किती मोठे राजकारण आहे हे आपण पाहतोय, असाही टोला त्यांनी लगावलाय.

गेल्या वर्षी अनेक दिग्गजांना ईडीने नोटिसा पाठवलेल्या आहेत. वर्षअखेरीस सरनाईक कुटुंब, एकनाथ खडसे, मिसेस संजय राऊत म्हणजेच वर्षा राऊत, रत्नाकर गुट्टे यांना ईडीने समन्स बजावलं होतं. भाजपशी वाकड्यात शिरल्याने ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा ससेमिरा मागे लावल्याचा आरोप प्रत्येक वेळी झाला.

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे खडसे क्वारंटाईन झाले. “माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस आहे. यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु” असं सांगत खडसेंनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती.

खडसे vs भाजप

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना नोटीस बजावल्याची जोरदार चर्चा आहे. जळगावमधील कथित बीएचआर घोटाळा त्यांनी बाहेर काढल्याने भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळ्यावर कारवाई होण्याआधीच खडसेंवर ईडीची कारवाई करुन त्यांना अडचणीत आणलं जाऊ शकतं. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तूर्तास त्यांची ईडी चौकशी पुढे ढकलली गेली आहे. परंतु हजेरीची टांगती तलवार कायम आहे.

खडसेंनी भाजपमध्ये असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले होते. आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना फोडून ते भाजपला मोठं खिंडार पाडण्याची भाजपला भीती असावी. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यास खडसे सक्षम असल्याचं मानलं जातं, त्यामुळेच खडसेंचा मेरु रोखण्यासाठी भाजपने ईडीचे शस्त्र उगारल्याचीही चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.