अमरावती जिल्ह्याच्या वझ्झर ग्रामपंचायतीतील दोन वॉर्डांमधून उमेदवारी अर्जच आले नसल्याची बाब पुढे आली आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या वझ्झर ग्रामपंचायतीतील दोन वॉर्डांमधून उमेदवारी अर्जच आले नसल्याची बाब पुढे आली आहे. तर याच ग्रामपंचायतीच्या एक नंबर वॉर्डमधून केवळ चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक कशा पद्धतीने होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात 44 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी आतापर्यंत 957 वैध अर्ज आले आहेत. तर उद्या (4 जानेवारी) निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार आहे. या तालुक्यातील कांडली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर याच तालुक्यातील वझ्झर ग्रामपंचायतमध्ये सर्वात कमी (केवळ चार) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
वझ्झर गट-ग्रामपंचायतीमधे केवळ एकाच वॉर्डातून ऊमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. तर इतर दोन वॉर्डातून ऊमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. याबाबत सदर वॉर्डांमधील नागरिकांना विचारले असता बहुतांश नागरिक त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत या दोन्हीही वार्डातून एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने आता या वॉर्डातून पुन्हा निवडणूक होण्याचे संकेत आहेत.
स्थानिक नागरिकांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, “आम्ही शासनाकडे बऱ्याचदा पाठपुरावा केला आहे. तसेच सर्व प्रकारची कागदपत्र जमा केली. मात्र केवळ कोतवाल नक्कल नसल्याने किंवा वडिलोपार्जित टीसी नसल्याने आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र शासनाकडून मिळत नाहीये. त्यामुळेच आम्ही या वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल करु शकलो नाही”.

