मनसेच्या खळखट्ट्याक पुढे अखेर अॅमेझॉनने नांगी टाकली आहे.
मुंबई: मनसेच्या खळखट्ट्याक पुढे अखेर अॅमेझॉनने नांगी टाकली आहे. आधी अॅमेझॉन अॅपमध्ये मराठीचा समावेश केल्यानंतर आता अॅमेझॉनने मनसे सैनिकांविरोधातील खटला मागे घेतला आहे. खटला मागे घेत असल्याचं पत्रंच अॅमेझॉनने दिंडोशी कोर्टाला दिलं आहे.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. यापूर्वी मनसेकडून अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती. काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही यावेळी मनसेने दिली होती.
त्यामुळे अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपविभागप्रमुख अखिल चित्रे यांच्याविरोधात न्यायालयात प्रतिबंधात्मक दावा केला होता. आज या खटल्यावर सुनावणी होणार होती. त्यामुळे संबंधितांना कोर्टात हजर राहावे लागणार होते. परंतु, अॅमेझॉनच्या वकिलांनी दिंडोशी कोर्टाला पत्रं देऊन दावा मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे मनसे आणि अॅमेझॉनच्या वादावर पडदा पडला आहे.
दरम्यान, अॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ‘अॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.

