शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0 झुंजार झेप न्युज

 नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे.

मुंबईः निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकारण केलं जात आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे, असा थेट हल्लाबोल भाजपचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. त्यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही, ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व ठरवून करतंय, असं टीकास्त्र फडणवीसांनी शिवसेनेवर सोडलंय.

शिवसेनेनं आता औरंगाबादचं संभाजी नगर करा, असं म्हणायचं. म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसनं ते करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे नूराकुस्ती आता सुरू झालीय. दोघांनाही या बाबतीत कुठलंही गांभीर्य नाहीये. केवळ हे एक प्रकारचे नाटक सुरू आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा औरंगाबादला रस्त्याला पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. 100 कोटी देतो असं सांगितलं होतं, पण ते आधीचे पैसे खर्च करू शकले नाहीत. 1600 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला दिले होते. आता त्याचा वर्कऑर्डर त्यांनी केला. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता चालवूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं अशा प्रकारची भाषा या ठिकाणी चाललेली आहे. नुसते पत्र पाठवत असतात, बाकी कुठलीही कारवाई ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर या गोष्टी का आठवतात, असंही फडणवीस म्हणालेत.

औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार

औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी भाजपने 1995 पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेत दिले होते. स्मरणपत्रेही दिले. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच जेव्हा जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी दिसून आली, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला होता. भाजपने औरंगाबाद पालिकेत चार वेळा नामांतराचा प्रस्ताव दिला आहे. पण शिवसेनेने हा प्रस्ताव दाखल करून घेतला नाही. तसेच बोर्डावरही हा प्रस्ताव आणला नाही, असा गंभीर आरोप करतानाच भाजपचे तत्कालीन नगरसेवक राजू शिंदे यांनी महापौरांना स्मरणपत्रं लिहिले असता वारंवार स्मरण पत्रं लिहू नये, असं महापौरांनी इतिवृत्तात म्हटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतराचं शिवसेनेच्या मनात होतं तर प्रस्ताव पुढे का आला नाही? असा सवालही त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.