सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात कडक फाईट आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात कडक फाईट आहे. अशातच आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा ‘जोर का झटका’ दिला आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने 28 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र निवडणुकीआधीच वैभववाडीत राजकारण तापू लागलं आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 103 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील 28 ग्रामपंचायत सदस्य राणेंच्या पुढाकाराने बिनविरोध निवडून आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भाजपचे 28 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह राणेंनी शक्तीप्रदर्शन करत सेनेला आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
वैभववाडीतील मांगवली या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर भाजपचे बिनविरोध पॅनल विजयी झाले. त्याबद्दल आमदार नितेश राणेंनी मांगवली गावातील गावकऱ्यांचे विशेष आभार मानले तसंच गावच्या विकासासाठी निधीचीही घोषणा केली.
राणेंचं वर्चस्व कायम
गेले अनेक वर्षांपासून खा. नारायण राणे यांचं सिंधुदुर्गात वर्चस्व कायम असल्याचं दिसून येतं. राणे शिवसेनेत होते तेव्हा बहुतांशी निवडणुकीत राणे सेनेच्या उमेदवारंना भरघोस मतांनी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत. नंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप-सेनेला धूळ चारण्यात राणेंना बहुतांशी वेळेला यश येत. तोच कित्ता राणे आता भाजपमध्ये आल्यानंतरही गिरवत आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचं वारं राज्यात वाहत आहे. सगळीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करुन त्यांना निवडणून आणण्यासाठी झुंजताना दिसतो आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भाजपचे 28 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून नितेश राणेंनी सेनेवर आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

