मुख्यमंत्र्यांकडून पंचगंगेतील प्रदूषणाची गंभीर दखल, जबाबदार कंपन्यांना टाळे ठोका, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0 झुंजार झेप न्युज

 पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी प्रदूषणामुळे काळवंडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंचगंगेच्या प्रदुषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी. त्यांना थेट टाळे लावण्यात यावे आणि त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

“पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी इत्यादी ठिकाणावरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. पंचगंगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पुर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे,” अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


“नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ते मागे घेण्यासंदर्भात सहानूभूतीपूर्वक विचार करण्यात येईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


नुकतंच पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी वर्षा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपास्थित होते.

तसेच पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांना दर महिन्याला अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पंचगंगा नदीत मृत माशांचा खच

पंचगंगा नदीत इचलकरंजी शहरातील अनेक उद्योगधंद्यातील प्रदूषित पाणी थेट मिसळले जाते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शुद्ध झालेली पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित झाली आहे. काही दिवसांपूर्वी या कारणामुळे तेरवाडच्या बंधाऱ्यावर लाखो मृत माशांचा खच पडल्याचं पहायला मिळाला होता.

पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात नदीकाठच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन केले होते. पण याची कोणीही दखल घेतली नव्हती. इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यांचे प्रदूषित पाणी नदीत मिसळत होते. मात्र या प्रदूषणामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.