…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे : गिरीश महाजन

0 झुंजार झेप न्युज

 “माझ्यावर केलेल्या आरोपांपैकी एक टक्का जरी गोष्ट खरी असेल तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांच्या तक्रारीनुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी आज (5 जानेवारी) संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

“मराठा विद्या प्रसारक संस्था जळगाव जिल्ह्यातील मोठी संस्था आहे. या संस्थेत दोन गट आहेत. या दोन्ही गटात खूप टोकाचे वाद आणि भानगडी आहेत. या सर्व भानगडीत अ‍ॅड. विजय पाटील पाच-सहावेळा जेलवारी करुन आले आहेत. त्यांचे मुलं, कुटुंबातील इतर सदस्यही जेलमध्ये जाऊन आले आहेत. आमचा त्या संस्थेशी काहीच संबंध नाही. या संस्थेतील सदस्य फक्त मराठा समाजाचेच आहेत. मी ओबीसी गुर्जर समाजाचा, माझा सहकारी रामेश्वर वंजारी, दुसरा मारवाडी समाजाचा आहे. आमचा कुठलाही संबंध नसताना आम्हाला संस्था ताब्यात घ्यायची आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. खरंतर हा गंभीर आरोप नाही तर हास्यास्पद आरोप आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

“माझ्यावर केलेल्या आरोपांपैकी एक टक्का जरी गोष्ट खरी असेल तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. ही घटना शंभर टक्के खोटी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी”, असं आवाहन त्यांनी केलं.

“तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची त्यांनी आता तक्रार केली. हा गुन्हा पुण्यात घडला. मात्र, याप्रकरणी त्यांनी तक्रार मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर निंभोरा पोलीस स्टेशनला केली. तिथून ते झिरो नंबरने पुण्याला आले. मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी आत्मीयता दाखवली. साहेब आमच्यावर प्रेशर आहे. काय करायचं अशाप्रकारची तक्रार आहे, त्यावर मी गुन्हा नोंद करायला सांगितला”, असं महाजन यांनी सांगितलं.

“कुठलाही संबंध नसताना तीन वर्षांनी त्यांनी गुन्हा दाखल केला. तुम्ही मोठे वकील होता, आमदारकीचे उमेदवार होता आणि मोठे नगरसेवक होता, मग इतके दिवस गुन्हा का दाखल केला नाही? त्यावर ते म्हणतात सरकारचा दबाव होता. नव्या सरकारला सव्वा वर्ष झालं. इतके दिवस का गुन्हा दाखल झाला नाही?”, असा सवाल त्यांनी केला.

“अतिशय बनवाबनवी चालली आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. अ‍ॅड. पाटलांचा बोलाचा धनी कोण ते सर्व जळगावकरांना माहिती आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्दीष्टाने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी तत्काळ त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी विनंती मी याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयावने याबाबत पोलिसांना आदेश दिले आहेत”, असं महाजन यांनी सांगितलं.

“मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. पोलिसांनी अजून चौकशीसाठी बोलावलेलं नाही. हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने याविषयी जास्त बोलणार नाही. खोटे गुन्हे दाखल करुन काही साध्य होणार नाही”, असंदेखील ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.