गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या यशाच श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाला दिलं आहे.
सातारा: शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाला यश मिळाल्याचं श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. ग्रामीण भागात पक्ष वाढविणे या मुख्य उद्देशानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं केलेल्या कामामुळे सेनेला यश मिळालं. शिवसेनेचा या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं असल्याचं शंभूराज देसाईंनी सांगितले. ते सातारा येथे बोलत होते.
शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदासंघात शिवसेनेने 63 पैकी 42 ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकवला. पाटण तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाल आहे. विरोधी गटापेक्षा दुप्पट ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्याामागे ग्रामीण भागात पक्ष वाढविणे हा मुख्य उद्देश होता, असं शंभूराज देसाई म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेचा ग्रामीण भागात विस्तार करण्यामागील उद्देश सफल झाला असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं यश
महाराष्ट्रात शिवसेनेला ग्रामपंचायतीत मिळालेले यश हे शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेले संयमी नेतृत्व यामुळे हे शक्य झालं. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला राज्यातील जनतेने स्वीकारलं असल्याचं या निकालातून स्पष्ट होते, असं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने कौल दिल्याचा दावा केला. भाजपपेक्षा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने स्विकारलेले आहे. हे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे, देसाई म्हणाले आहेत. सातारा जिल्हयात शिवसेनेला मिळालेले यशामुळे याचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे का ? या प्रश्नाबाबत शंभुराज देसाई यांनी शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे सांगून प्रश्नाला बगल दिली आहे.
सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून पाटण आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने चांगलं यश मिळवलं आहे. शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील महत्वाच्या ग्रामपंचायंतींवर विजय मिळवला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या गावातही सत्तांतर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांन चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

