पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून त्याला हिंसेचं गालबोट लागतानाही दिसत आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून त्याला हिंसेचं गालबोट लागतानाही दिसत आहे. काल शुक्रवारी खडगपूर शहरातील मथुराकाटी येथे अज्ञात लोकांनी तृणमूलचे नेते अर्जुन सोनकर यांना गोळी घातली. बाईकवरून जात असताना सोनकर यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनकर यांना लगेचच खडगपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
30 वर्षीय अर्जुन सोनकर हे खडगपूर जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे युवा नेते होते. सोनकर यांची हत्या राजकीय वादातून की जुन्या वादातून
झालीय? याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सोनकर हे मथुराकाटी येथील बेबी राणी ग्राऊंडवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गोळी घातली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सोनकर हे बाईकने जात असतानाच त्यांना गोळी घालण्यात आली. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यातच खाली कोसळले असता स्थानिकांनी सोनकर यांना तात्काळ उचलून संभाग रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
काल दुपारी 3 वाजता सोनकर यांना एक फोन आला होता. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले होते. संध्याकाळी त्यांची हत्याच झाल्याची बातमी आल्याचं सोनकर यांच्या कुटुंबानं म्हटलं आहे. तर, सोनकर यांची हत्या झाली त्या ठिकाणी पिस्तुलाच्या गोळीचा एक बॉक्स सापडला आहे. तृणमूलनेही सोनकर त्यांचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हावडातही तृणमूल कार्यकर्त्याची हत्या
29 डिसेंबर रोजी हावडा येथे तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या झाली होती. धर्मेंद्र सिंह असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी शालीमार येथील घरातून बी गार्डनकडे जात असताना काही बाईकस्वारांनी धर्मेंद्रच्या दिशेने पाच राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. त्यात धर्मेंद्रचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

