कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाहीः जयंत पाटील

0 झुंजार झेप न्युज

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाहीः जयंत पाटील

 सातारा: संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्यात. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री यांनी प्रतिक्रिया दिलीय. ”जे पुरावे पुढे येतील, त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असं जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी (Jayant Patil)स्पष्ट केलेय. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. याबाबत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आले. जे पुरावे समोर येतील त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचे स्पष्ट केलेय. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत पत्रकारांनी जयंत पाटलांना विचारणा केली, त्यावर ते म्हणाले मला चंद्रकांत पाटील यांच्यापुरते मर्यादित ठेवू नका. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, असे उत्तर देत चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती दिली पाहिजे, असा उपरोधिक टोला देखील जयंत पाटलांनी लगावला.

त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार : अनिल देशमुख

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. या प्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 1 जानेवारीला पुण्यात दिली होती.

कोरेगाव-भीमा दंगल

कोरेगाव-भीमा युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनी 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार घडला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यापार्श्वभूमीवर अशी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा चोख बंदोबस्त तिथे ठेवण्यात आला आहे.शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याशिवाय, काल संध्याकाळ 5 वाजल्यापासून आज रात्री 12 पर्यंत पुणे – अहमदनगर महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे.

इतिहास काय?

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष महार समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्यावेळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे.

हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. यावेळी आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटीश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.

फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि पेशव्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर पेशव्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकात सापडतो.

दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.