करोनानं २४ तासांत घेतले १३४१ बळी! २ लाख ३४ हजार ६९२ नव्या बाधितांची नोंद!

0 झुंजार झेप न्युज

देशात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याचं चित्र दिसू लागलं असून मृतांचे वाढणारे आकडे देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

कोरोना व्हायरस:काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं करोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. आणि यंदा वाढताना हे प्रमाण भीषण होऊ लागलं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देखील जितके रुग्ण आढळले नव्हते आणि जितक्या रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता, ते करोनाचे आकडे आता दिसू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ४ दिवसांपासून रोज देशभरात १ हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. त्यामुळे विविध राज्यांसोबतच केंद्रीय प्रशासन देखील चिंतेत आलं असून त्यापाठोपाठ नवीन करोनाबाधित आढळण्याचं प्रमाण देखील रोज नवनवे विक्रम करत आहे. गेल्या २४ तासांची आकडेवारी पाहाता देशभरात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे ही देशवासीयांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

आजपर्यंत १ लाख ७५ हजार ६४९ मृत्यू

देशातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण करोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात १६ लाख ७९ हजार ७४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत करोनामुळे तब्बल १ लाख ७५ हजार ६४९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातही वेगाने रुग्णसंख्येत वाढ!

महाराष्ट्राचा विचार करता, शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.

इथून पुढे कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती!

देशात सध्या ५ राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्यासोबतच, कुंभमेळा देखील सुरू असून या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यासाठी कारणीभूत होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नियम अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त केली जाऊ लागली आहे. निवडणूक आयोगाने त्यावर एक पाऊल टाकताना पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे जाहीर प्रचारसभा, नुक्कड सभा, पथनाट्य किंवा रॅली करण्यावर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळीच कुंभमेळा इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रतिकात्मक ठेवण्याची विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.