पुणे - आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सुविधा देण्यासाठी आणि यात्राकाळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना, तसेच यात्रा सुखकर होण्यासाठी विविध विभागप्रमुख, अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी शनिवारी दिल्या.
आळंदी कार्तिकी यात्रा १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे. असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गायकवाड यांनी विस्तृत आढावा घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, खेडचे उपविभागीय अधिकारी एस. बी. तेली, श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील, मुख्याधिकारी समीर भूमकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, विश्वस्त अभय टिळक आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, यात्रेसाठी स्वच्छता, सुविधा, सुरक्षा, आरोग्य या बाबींवर भर दिला जाणार आहे.

