पुणे : पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या ६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर होणारी ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेत विधानसभा आचारसंहितेमुळे रखडलेल्या विकासकामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळू शकणार आहे.
झेडपीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही पदाधिकारी म्हणून ही शेवटची सर्वसाधारण सभा असणार आहे. यानंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेला नवे अध्यक्ष आणि पदाधिकारी असणार आहेत. त्यामुळे सध्याचे पदाधिकारी हे नव्या वर्षात (२०२०) होणाऱ्या सभेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून उपस्थित राहतील.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यातून एकदा होत असते. याआधीची सभा विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापुर्वी म्हणजेच ९ सप्टेंबरला झाली होती. दरम्यान, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या २० जानेवारीला संपत आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १९ किंवा २० जानेवारीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. या सभेत नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील.

