बेलगाम वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या भोपाळच्या भाजप खा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे देखील यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे.
संरक्षण खात्याच्या समितीत अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे नेतृत्व करणार आहेत. तर यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आल्याने यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मात्र तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यावरूनही निवडणुकीच्या काळात मोठा वाद निर्माण झाला होता.

